UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

अशी काय बरं जादू आहे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी या नावांमध्ये? महाराष्ट्र आणि मराठी इतिहास

 


महाराष्ट्र आणि मराठी इतिहास

मराठी माणूस कोण, याची एक साधी-सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस! याच चालीवर असे म्हणता येईल की, ‘ग्यानबा – तुकाराम’ हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? ‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ‘ या शब्दात जिचे वर्णन केले जाते, त्या परंपरेशी प्रत्येक मराठी माणूस प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जोडलेला असतो. ‘ग्यानबा-तुकाराम’ याप्रमाणे ‘शिवाजी महाराज की जय’ या मंत्रानेसुध्दा मराठी माणूस भारलेला असतो. अशी काय बरं जादू आहे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी या नावांमध्ये? ही तुमच्या-आमच्यासारखीच हाडा-मांसाची माणसे होती; पण कालच्या आणि आजच्या मराठी समाजाला व्यापून राहिलेल्या सांस्कृतिक बंधुभावाची ती महान प्रतीके होती. अशा प्रतिकांद्वारे आपल्याला परंपरा कळते, संस्कृती कळते, इतिहास कळतो. पण इतिहास म्हणजे अशा प्रतिकरूप व्यक्तींची निव्वळ चरित्रे मात्र नव्हेत. या व्यक्तींनी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व केले, त्या समाजाची सर्वांगीण कथा म्हणजे इतिहास. तो समजावून घ्यायचा तर आपल्या दृष्टीचा पल्ला फार दूरवरचा आणि विस्तारित क्षेत्रातला असायला हवा. आता हेच पहा ना! मराठयांच्या इतिहासापूर्वीसुध्दा या भूमीत ऐतिहासिकदृष्टया काही अर्थपूर्ण घडले होते, याचा अनेक मराठी माणसांना विसर पडतो. शिवाजीपूर्वी काय, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी स्मरणशक्तीला ताण दिल्यावर सर्वसामान्य मराठी माणूस फारतर ज्ञानेश्वरांपर्यंत मागे पोहोचतो. पण त्याआधी काय, या प्रश्नाचे उत्तर अनेकांच्या गावीच नसते! म्हणून प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की –

शिवाजी हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा आरंभबिंदू नसून तो एका मोठया ऐतिहासिकदृष्टया प्रक्रियेचा कळसबिंदू होता. तसेच

ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा आरंभबिदू नसून तो एका साहित्यिक- सांस्कृतिक प्रक्रियेचा कळसबिंदू होता.

कोणत्याही भाषेचा उगम ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे. मराठी भाषेचा उगम आणि विकास हीसुध्दा एक दीर्घकालीन प्रक्रिया होती. ही प्रक्रीया समजावून घेताना ज्या समाजात आणि भूप्रदेशात मराठी विकसित झाली, त्या समाजाचा आणि भूप्रदेशाचा ऐतिहासिकदृष्टया विकासक्रम सुध्दा लक्षात घेतला पाहिजे.

महाराष्ट्रात सुमारे दीड ते दोन लाख वर्षांपूर्वीपासून तरी मानवी वस्ती आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात महत्त्वाचा मानला गेलेला शेतीचा टप्पा महाराष्ट्रात सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुरू झाला. त्या पाषाणयुगीन संस्कृतीचे असंख्य अवशेष महाराष्ट्रभर उपलब्ध झालेले आहेत. ही संस्कृती इसवीसनपूर्व सुमारे २००० ते १००० या काळात महाराष्ट्रात नांदत होती. धुळे-नंदुरबार भागातील सावळदा, कावठे, प्रकाश; नाशिक जिल्ह्यातील गंगापूर; अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद , जोर्वे, नेवासे, ; पुणे जिल्ह्यातील इनामगाव – यांसारख्या कितीतरी ठिकाणी झालेल्या उत्खननांमधून या संस्कृतीच्या काळातील लोकजीवनावर प्रकाश पडतो. घरांचे अवशेष, पाण्याचे व धान्याचे रांजण, पाटा-वरवंटा, काळया-तपकिरी रंगात नक्षीकाम केलेली तांबडी-पिवळी खापरे, मद्याचे कलात्मक चषक, गारेच्या दगडांची व तांब्याची हत्यारे , मासेमारीचे गळ असे कितीतरी अवशेष मिळाले आहेत. नायकशाही (chiefdom) शासनव्यवस्थेचे ; गहू, तांदूळ, बाजरी, डाळी व कापसाच्या लागवडीचे ; महाराष्ट्राबाहेरील प्रदेशाबरोबर व्यापाराचे; बहुपत्नीत्वाच्या चालीचे; पितरपूजेचे; दफनविधी व शवकुंभांचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध झाले आहेत. (शवकुंभ म्हणजे मातीच्या ज्या कुंभात मृतदेह घालून, पुरून ठेवत ते कुंभ . विशेषत: लहान मुलांचे मृतदेह असे पुरत ). आज नगर जिल्ह्यात हरणे व माळढोक पक्षांचे ‘रेहाकुरी अभयारण्य’ आहे. त्या पाषाण संस्कृतीच्या काळातही तिथे हरणे व माळढोक पक्षी खूप प्रमाणात होते. त्या पाषाण संस्कृतीच्या -हासकाळी त्याच भागात हरणे व माळढोकच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याचे पुरावे मिळाले आहेत त्यावरून हे सिध्द झालेले आहे. इ.स.पू. १००० च्या सुमारास पर्यावरणीय बदलांमुळे महाराष्ट्रातील शेतीला अवकळा प्राप्त झाली, मानवी वस्त्या उजाड पडू लागल्या आणि संस्कृतीचा -हास घडून आला.

यानंतरच्या काही शतकांच्या इतिहासासाठी आपल्याला पुराणकथांवर अवलंबून रहावे लागते. अगस्तीऋषी हा विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत येणारा पहिला आर्य मानला जातो. त्याने विदर्भातील मुंडा राजकन्या लोपामुद्रा हिच्याशी विवाह केला. रामायणातील जनस्थान, पंचवटी आणि दण्डकारण्य हे उल्लेख महाराष्ट्र-भूमीशी निगडित आहेत. नाशिकचा पंचवटी परिसर राम-सीतेच्या वास्तव्याने पुनीत झाल्याचे मानले जाते. अपरान्त म्हणजे कोकणच्या प्रदेशात परशुरामाने वसाहत केल्याची पुराणकथा प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पुढचा टप्पा होता लिखित पुराव्यांचा आणि राजघाराण्यांच्या राजवटींचा. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात प्रियदर्शी अशोकाच्या मौर्य सामराज्यात महाराष्ट्राचासुध्दा समावेश होता. ठाणे जिल्ह्यातील सोपारा आणि चांदा जिल्ह्यातील देवटेक येथे अशोकाचे शिलालेख सापडले आहेत. मात्र सातवाहन हेच महाराष्ट्राचे पहिले स्थानिक राज्यकर्ते म्हणता येतील. त्यांच्यापासूनच्या दीड सहस्त्र वर्षांत महाराष्ट्राच्या विविध भागात अनेक राजघराण्यांनी राज्य केले. अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, शिलाहार आणि यादव ही त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण घराणी होत. या सर्वांच्या इतिहासाची तपशीलवार ओळख स्वतंत्रपणेच करून घ्यावी लागेल. पण आपल्या सामान्य ज्ञानाचा भाग म्हणून निदान काही ठळक गोष्टींची तरी आपल्याल ओळख असायला हवी. उदाहरणार्थ, कार्ले, भाजे, नाशिकची पांडव-लेणी येथे सातवाहनांची शिल्पकला आजही पहायला मिळते. नाणे-घाटातील शिलालेखात सातवाहनांच्या संदर्भात ‘महारठिनो गणकइरो’ (महारठ गणाचा सदस्य) असा उल्लेख आहे. तो इ.स.पूर्व पहिल्या शतकातला मानला जातो. सातवाहनांचे रोमन लोकांशी व्यापारी संबंध होते. म्हणून तर टॉलेमी आणि प्लिनी यांच्या लेखनात सातवाहन राज्याची वर्णने आढळतात. प्रतिष्ठान (आजचे पैठण) या सातवाहन राजधानीचा आणि तटबंदी असलेल्या तीस नगरांचा उल्लेख आढळतो. गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स. १०६ ते १३०) हा शक, यवन (ग्रीक) आणि पहलव अशा परकीयांना नेस्तनाबूत करणारा आणि दक्षिण भारताभोवतीच्या तीन समुद्रांपर्यत साम्राज्यविस्तार साधणारा महापराक्रमी सम्राट होता. तो ‘शककर्ता’ म्हणून ओळखला जातो. इतिहासकारांच्यात मात्र या कालगणनेविषयी मतभेद आहेत. शालिवाहन शक खरे तर कुषाण राज्यकर्ता कनिष्क याने सुरू केला असे काहीजण मानतात. वकाटक हे मुख्यत: विदर्भाचे नृपती. त्यांच्या काळात महाकवी कालिदासाने महाराष्ट्राला भेट दिल्याचे मानले जाते. त्याच्या ‘मेघदूता’तील ‘रामगिरी’ म्हणजे विदर्भातील रामटेक होय, असा काही अभ्यासकांचा कयास आहे. अजिंठयाच्या अजरामर चित्रकृतींपैकी अनेक कृती वाकाटकांच्या युगातील आहेत. वाकाटक राज्यकर्त्यांनी उत्तरेतील बलाढय गुप्त राजघराण्याशी विवाहसंबंध जोडून सलोखा साधला होता. वाकाटकांच्या संधिकालाच्या सुमारास लिहिल्या गेलेल्या सिंहली बौध्दांच्या ‘महावंश’ या पुराणात (इ.स. ४७५) महाराष्ट्रातील चार प्रदेशांचा उल्लेख आढळतो. सम्राट हर्षवर्धनाला पराभूत करणारा पराक्रमी चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याने महाराष्ट्रातसुध्दा अंमल प्रस्थापित केला होता. विजापूर भागातील शिलालेखात ( इ.स. ६३४) त्याला ‘तीन महाराष्ट्रांचा (विदर्भ, देश आणि अपरान्त यांचा) स्वामी’ म्हटले आहे. त्याच्या काळात (इ.स. ६४१)चिनी प्रवासी ह्यूएन्त्संग याने महाराष्ट्राला भेट दिली . ह्यूएन्त्संगाचे महाराष्ट्र-वर्णन मोठे अर्थपूर्ण आहे: या भागातील जमीन सुपीक असून मशागतीखाली आहे. हवामान ऊष्ण आहे. लोक धाडसी, उमदे परंतु प्रामाणिक आणि साधे आहेत. विद्याभ्यासाचे चाहते आहेत. उपकारकर्त्याचे ऋण ते कधीही विसरणार नाहीत. मदतीसाठी हात पुढे केला तर ते जरूर धावून येतील; परंतु कोणी अपमान केला तर प्राणाची तमा न बाळगता ते त्याच्यावर सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याच्यावर हल्ला करायचा आहे, त्याला ते पूर्वसूचना देतील. त्याचप्रमाणे शस्त्रसज्ज होण्यास वेळ देतील. नंतरच त्याच्याशी चार हात करतील. पळणा-या शत्रूचा ते पाठलाग करतील, पण शरणागताला उदार मनाने अभय देतील.’

महाराष्ट्राच्या मातीचा ह्यूएन्त्संगाला जाणवलेला स्वभावधर्म – ‘मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे’ या १७ व्या शतकातील तुकारामांच्या उक्तीत आणि ‘राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा’ या २० व्या शतकातील गोविंदाग्रजांच्या वर्णनातसुध्दा जाणवल्यावाचून रहात नाही. राष्ट्रकूट हे इ.स. च्या ८ व्या ते १० व्या शतकापर्यंत महाराष्ट्राचे राज्यकर्ते होते. दक्षिणेतून उत्तरेत स्वा-या करून पराक्रम गाजवणारे अपवादात्मक राज्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या काळात एकसंध पाषाणातून खोदलेले वेरूळचे कैलासमंदिर हे जगातील एक स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते. कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर याच्या ‘मानसोल्लास’ (११२९) या ग्रंथातील मराठी गीते म्हणजे मराठी वाड्मयाच्या आरंभकालीन पाऊलखुणाच म्हटल्या पाहिजेत. कोल्हापूर येथे अंबाबाईच्या मंदिराचे मूळ बांधकाम शिलाहार नृपतींच्या काळातच झाले, असे मानले जाते. प्रामुख्याने १२व्या शतकाच्या उत्तरार्धापासून १४व्या शतकाच्या आरंभकालापर्यंत महाराष्ट्रात सत्ता गाजवणारे देवगिरीचे यादव घराणे ऐतिहासिक दृष्टया फार महत्त्वपूर्ण आहे. कारण ज्याला आपण ‘मराठी संस्कृती’ म्हणतो तिचा विस्तृत आणि भक्कम पाया घातला गेला , तो यादवांच्याच काळात. महाराष्ट्राच्या समाजजीवनाची अनेक वैशिष्टये आणि वैगुण्येसुध्दा यादवकाळात आकाराला आली. १२९४ मधील अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीपासून महाराष्ट्राच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू झाले. दिल्लीची सुलतानशाही व पुढे मुघलशाही, दक्षिणेतील मुस्लिम राजवटी – विशेषत: निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही यांनी महाराष्ट्रात वेगवेगळया काळात आणि प्रदेशात वर्चस्व गाजवले. काही मुस्लिम राज्यकर्ते आणि सूफी संत यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला अर्थपूर्ण योगदान केले. शिवपूर्व काळातल्या भक्तिचळवळीने महाराष्ट्राला एक नवचैतन्य प्राप्त करून दिले. आध्यात्मिक समतेचे आणि मानवतेच्या कर्मयोगी धर्माचे तत्वज्ञान लोकभाषेत मांडून वारकरी संप्रदायाने मराठी अस्मिता जागृत केली आणि शिवकार्याची पार्श्वभूमी घडवली. १७व्या शतकात शिवाजी महाराजांनी (१६३०-८०) मराठयांचे स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या स्वाभिमानी, लोकहितकारी आणि धर्मसहिष्णू धोरणामुळे एक नवे पर्व सुरू झाले. ‘बहुत जनांसि आधारू’ आणि ‘जाणता राजा’ हे समर्थ रामदासांनी केलेले त्यांचे वर्णन अगदी यथार्थ होते. ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही रामदासोक्ती म्हणजे त्या काळचा युगधर्मच होता. शिवाजी महाराजांनंतर संभाजी , राजाराम आणि ताराबाई यांनी औरंगजेबाच्या प्रलयंकारी आक्रमणापासून मोठया शर्थीने स्वराज्याचा बचाव केला.

१८व्या शतकात – पेशवाईच्या कालखंडात- मराठयांची सत्ता ही भारतातील एक समर्थ शक्ती बनली. एकीकडे थोरल्या बाजीरावाची दिल्ली धडक आणि राघोबाची अटकेपर्यंतची भरारी, तर दुसरीकडे पानिपतचा दारूण पराभव (१७६१) आणि थोरल्या माधवरावांनी अल्पकाळ सावरलेली घडी – अशा चढउतारांच्या पार्श्वभूमीवर १९व्या शतकात मात्र मराठयांच्या सत्तेचा -हास घडून आला. १८१८ मध्ये महाराष्ट्रात इंग्रजांचा अंमल प्रस्थापित झाला. १९वे शतक हे महाराष्ट्रातील जनजागृतीचे युग ठरले. तेव्हापासून महाराष्ट्राने समाजसुधारणा आणि राष्ट्रवादी राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये फार मोठी कामगिरी बजावली. महात्मा फुले, न्या. रानडे, आगरकर, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, राजर्षि शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर , यशवंतराव चव्हाण आशी काही मोजकी नावे उच्चारली तरी आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक योगदानाची कल्पना येऊ शकते. भारतीय स्वातंत्र्यप्राप्ती (१९४७) आणि संयुक्त महाराष्ट्र-निर्मिती ( १ मे १९६०) या महाराष्ट्रेतिहासातील विशेष महत्त्वाच्या घटना. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच, पण भारताची ‘औद्योगिक राजधानी’ म्हणूनही ती ओळखली जाते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक दृष्टया प्रगत राज्य आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीत आणि संगणक-युगाच्या शर्यतीतसुध्दा महाराष्ट्र हे अग्रेसर राज्यांपैकी एक गणले जाते. दादासाहेब फाळके, बालगंधर्व, पु.ल.देशपांडे, लता मंगेशकर, खाशाबा जाधव, सचिन तेंडुलकर एवढी नांवे उच्चारली तरी आधुनिक महाराष्ट्राच्या कला-क्रीडाक्षेत्रांतील प्रगतीची झलक कळू शकते. महाराष्ट्राच्या इतिहासाची ही सारी वाटचाल घडत असताना मराठी भाषेने जो आकार घेतला, त्याची कूळकथाही बघण्याजोगी आहे. मराठीचा थोडाफार वापर केलेले शिलालेख इ.स.च्या १० व्या-११ व्या शतकापासून आढळतात. मराठीतील पहिली ग्रंथरचना तेराव्या शतकातील आहे. त्यामुळे मराठी भाषा निदान ८व्या-९व्या शतकापासून तरी अस्तित्वात असावी, असा निष्कर्ष काढता येतो. त्याआधीची काही शतके जी भाषा-विषयक उत्क्रांती घडत होती, तिचे एक फलित म्हणजे मराठी भाषेची निर्मिती होय. या संदर्भात जाणकारांमध्ये एकमत नाही. परंतु मराठीची भाषिक वंशावळ कोणती, याविषयीचे दोन ठळक मतप्रवाह पुढीलप्रमाणे दाखवता येतील –

१. मराठीला संस्कृतोत्पन्न मानणा-यांना मान्य असणारा विकास क्रम :

-संस्कृत – महाराष्ट्री प्राकृत – महाराष्ट्री अपभ्रंश – मऱ्हाटी (मराठी).

२. मराठीला प्राकृतोत्पन्न मानणा-यांना मान्य असणारा विकासक्रम :

-वेदपूर्व देशी भाषा-पाली- महाराष्ट्री प्राकृत-महाराष्ट्री – अपभ्रंश-मऱ्हाटी (मराठी)

वरील दोन्ही मतप्रवाहांमध्ये महाराष्ट्री प्राकृतला मध्यवर्ती स्थान आहे. प्राकृत भाषांचा व्याकरणकार वररुचि (इ.स. १ले शतक) याने त्या भाषांमध्ये महाराष्ट्री प्राकृतला अग्रस्थान दिले, हे अर्थपूर्ण होय. सातवाहन राजा हाल याने प्रतिष्ठान येथे लिहिलेला याच भाषेतील ‘ गाथासप्तशती’ हा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. मराठीपूर्व प्राकृत व अपभ्रंश या दोन्ही टप्प्यांम्ध्ये ‘महाराष्ट्री’ हा शब्द असला, तरी या भाषा केवळ महाराष्ट्रापुरत्या सीमित नव्हत्या; त्यांचा क्षेत्रविस्तार त्याहून मोठा होता. किंबहुना वांशिक, धार्मिक, भाषिक व सांस्कृतिक दृष्टया महाराष्ट्र हा वैविध्य आणि वैचित्र्यातून घडलेला आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्र ही प्राचीन काळापासूनच विविध प्रवाहांची संयोगभूमी ठरलेली आहे. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान आणि मराठी माणसाचे समावेशक मन यांमुळेच हे शक्य झाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे बहुरंगी पदर लक्षात घेतले की संकुचित प्रादेशिकतावादाला जागा उरत नाही. सोमेश्वराच्या ‘मानसोल्लासा’त अशा अर्थाचा उल्लेख आहे की, महाराष्ट्रातील स्त्रिया जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणतात. ओवी आणि अभंग हे लोकछंद पुढे महानुभावांनी आणि ज्ञानेश्वरांपासूनच्या संतकवींनीही मोठया प्रमाणात वापरले. श्रवणबेळगोळच्या शिलालेखात ‘श्रीचामुण्डराये करवियले’ असा मराठी उल्लेख आहे. हा मजकूर इ.स. ९८३ मधील असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. त्यामुळे शिलाहार राज्यकर्ता केशिदेव याचा कुलाबा जिल्ह्यातील अक्षी येथील शिलालेख (१०१२) हा आद्य मराठी शिलालेख मानला जातो. त्याबाबतही काहींचे मतभेद आहेतच! आद्य मराठी ग्रंथाविषयीसुध्दा बराच खल झाला. मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ , श्रीपतीची ‘ज्या तिषरत्नमाला’, माहिंभटाचे ‘लीळाचरित्र’ आणि ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ या चार ग्रंथांना वेगवेगळया अभ्यासकांनी आद्यत्वाचा मान दिला. पण बहुसंख्य अभ्यासक आता असे मानतात की, महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर यांच्या चरित्रपर असा माहिंभटाचा ‘लीळाचरित्र’ (१२७८) हा आद्य मराठी ग्रंथ होय. यानंतर लवकरच ‘ज्ञानेश्वरी’ च्या रूपाने वाड्मय-तत्वज्ञानाचे उत्तुंग शिखर गाठले गेले (१२९०). याचा अर्थ, यादवकाळ हा मराठी ग्रंथकर्तृत्वाच्या पहिल्या बहराचा काळ होता. शहरी आर्यांची म्हणून ‘देवनागरी’ म्हटली गेलेली भारतीय लिपी हीच मराठीची लिपी होय. तिला ‘बाळबोध’ लिपी असेही संबोधले गेले. धावत्या लेखनाच्या सोयीसाठी ‘मोडी’ लिपी विकसित झाली. 

त्याचे श्रेय काही अभ्यासकांनी यादवांचा कर्तृत्ववान मंत्री हेमाद्री तथा हेमाडपंत याला दिले आहे. ‘हेमाडपंती मंदिर-शैली’ सुध्दा त्याच्या नावाने ओळखली जाते. मराठयांच्या इतिहासाची असंख्य साधने मुळात मोडीतच लिहिलेली आहेत. व-हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी अशा मराठीच्या कितीतरी बोली प्रचलित आहेत. मराठीच्या जन्मकाळात अरबी-फारसी, भाषांशी शब्दांची आवक-जावक घडली; पण ती अगदीच नगण्य होती. उदाहरणार्थ, फारसीच्या संपर्कापासून ज्ञानेश्वरी पूर्णत: मुक्त आहे. यादवकाळानंतर मात्र मराठीचा फारसीशी संवाद खूपच वाढला. १९ व्या शतकापासून उर्दू, हिंदी व इंग्रजीशी देवाणघेवाण वाढत गेली. भाषा नदीसारखी प्रवाही असते. येऊन मिळेल ते पोटात घेऊन कधीकधी ती प्रदूषित झाल्याचेही काहींना जाणवते. मग भाषावृध्दी होत असताना भाषा शुध्दीही हाती घेतली जाते. मराठी भाषेचा इतिहास याला अपवाद कसा असेल? मराठीच्या वृध्दीला अनेक साहित्यिकांनी हातभार लावला. संतसाहित्य हा तर मराठी भाषेचा प्राणच म्हटला पाहिजे. संत, पंत (पंडित-कवी) आणि तंत (शाहीर) यांनी मराठी भाषेला जोम प्राप्त करून दिला. अर्थात या सर्वांच्या आधी लोकवाड्मयाने तिला चालती-बोलती केली होती. मराठीच्या अभिमानाची कूळकथा मोठी बोलकी आहे. महानुभावांनी तिचा जाणीवपूर्वक वापर केला. ज्ञानेश्वरांनी तिच्याद्वारे अमृताशी पैज जिंकण्याची भाषा केली. एकनाथांनी तर रोकडा सवालच विचारला की, संस्कृतवाणी देवांनी घडवली, तर आमची मराठी ही काय चोरांनी जन्माला घातली काय? १६१४ मध्ये ‘क्रिस्तपुराण’ लिहिणा-या फादर स्टीफन्ससारख्या ख्रिस्ती मिशन-याने मराठीचा महिमा गाऊन तिला ‘सर्व भाषांमाजि साजिरी’ ठरविली. शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’ करवून घेऊन राजकीय भाषाशुध्दी साधली.

१९व्या शतकात ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणवणा-या चिपळूणकरांनी तिच्या वृध्दीची हाक दिली. माधव जूलियन यांनी १९२२ मध्ये या मायबोलीची सुंदर आरती आळवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुध्दीची जोरदार मोहीम उघडली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामीण, दलित, आदिवासी अशा साहित्यप्रवाहांनी मराठीला नवे चैतन्य प्राप्त करून दिले. ‘जागतिक मराठी परिषदे’ने ‘हे विश्वचि माझे घर’ या उक्तीचा अनोखा आविष्कार घडवला. आता संगणकाशी सलगी करत मराठी भाषा विस्तारत आहे. जागतिकीकरणाच्या नवयुगाशी जमवून घेण्यासाठी मुलांना ‘पहिलीपासून इंग्रजी ‘ शिकवले तरी आजही मराठी माणसाच्या मनात माधव जूलियनांचीच भावना रुजलेली आहे.

‘मराठी असे आमुचि मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असू,

पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र ज्ञानमंदिरी

जगन्मान्यता हीस अरपू प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी ‘.


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

This information is provided by Smt.Vibha Gundalwar 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++marathi medium 4th std history book,marathwada mukti sangram history in marathi,rajgad fort pune history in marathi,4th standard marathi history book,marathi history shivaji maharaj,history of marathi language in hindi,shivaji maharaj marathi history,mpsc lectures in marathi history,santaji ghorpade history in marathi,raigad fort history in marathi,panhala fort history in marathi,shiva kashid history in marathi,madhyayugin bharat history in marathi,marathi shivaji history in tamil,marathi history story,marathi history in tamil,marathi history movie,marathi history channel,marathi history speech,marathi history lecture,marathi history song,marathi history serial,marathi history in hindi,marathi history mcq,history marathi mpsc,tararani marathi history,maharashtra history in marathi,history of maratha,marathi story,mpsc history question paper analysis,maharashtra history questions,maharashtra history unacademy,maharashtra history in english,maharashtracha bhugol in marathi,marathi vs hindi,adhunik bhartacha itihas in marathi,samaj sudharak in marathi,marathi classical language,marathi grammar,prakrit languagecredit to https://marathiworld.com/sanskruti



Post a Comment

0 Comments